🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------
🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
🔅 *पंचांग* 🔅
तिथी - कार्तिक षष्ठी
पक्ष - कृष्ण
शके - १९४४
नक्षत्र : पुनर्वसु
सूर्योदय - ६ वा.४५मि.
सूर्यास्त - ६ वा.००मि.
दिनांक - १४ /११/२०२२
वार - सोमवार
महिना : नोव्हेंबर
------------------------------------------
🔅 *सुविचार* 🔅
जो कर्तव्याला जागतो,
तो कौतुकास पात्र होतो.
Who wakes to duty, He deserves praise.
------------------------------------------
🔅 दिनविशेष 🔅
१४ नोव्हेंबर महत्वाच्या घटना :
१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला. १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली. १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला. १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
१४ नोव्हेंबर जन्मदिन:
१९१८: बी. के. एस. अय्यंगार - भारतीय योग
प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे निर्माते - पद्म
विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९१८: मूळगावकर - चित्रकार रघुवीर
१९०४: हेरॉल्ड लारवूड - इंग्लिश क्रिकेटपटू
१८९१: बिरबल सहानी - पुरावनस्पती शास्त्रज्ञ
१८८९ : पं. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले -
पंतप्रधान - भारतरत्न
१८८८: मौलाना अबूल कलाम आझाद - भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न
१८६३ : लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड अमेरिकन
रसायनशास्त्रज्ञ
१४ नोव्हेंबर निधन :
२०१३ : सुधीर भट - भारतीय निर्माते आणि
व्यवस्थापक
२०१३: हरि कृष्ण देवसरे - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९९३: मणिभाई देसाई - भारतीय ग्रामीण
२००० : प्रा. योगेश्वर अभ्यंकर - भारतीय गीतकार व सर्जनशील कवी विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार १९७७ : स्वामी प्रभूपाद - हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
१९७१: नारायण हरी आपटे - कादंबरीकार,
चित्रपट कथालेखक
१९६७: सी. के. नायडू - क्रिकेटपटू
-----------------------------------------
🔅 *बातम्या* 🔅
नांदेड - भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट, नाना पटोलेंचा टोला
ठाणे - शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबध्द - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बुलढाणा - अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते 6 वे राज्यस्तरीय सुजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन
कराड : सोमवारी ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या
कल्याण : काळा तलावाचे सुशोभीकरण महिन्याभरात पूर्ण होणार - कपिल पाटील
भीमा साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात; 15 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात
तामिळनाडू : अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा इशारा, धरणाचे दरवाजे उघडले
उत्तर प्रदेश : डिंपल यादव उद्या मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता
नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्ली एनआरसीमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
क्रिकेट : T20 वर्ल्डकप इंग्लंड संघाने जिंकला अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.
------------------------------------------
🎄 **व्यक्तीविशेष* 🎄
🔅पं जवाहरलाल नेहरू🔅
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. आयर्लंडमध्ये झालेल्या सिन फेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं. भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता.
१९१२ मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले. १९१९ मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. १९१६ मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. त्यांनी १९२० मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. १९२०-२२ दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.
सप्टेंबर १९२३ मध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशियाचा दौरा केला. बेल्जिअममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. १९२७ मध्ये मॉस्को येथे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले. तत्पूर्वी १९२६ मध्ये मद्रास काँग्रेसमध्ये काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाप्रती कटिबध्द बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९२८ मध्ये लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. २९ ऑगस्ट १९२८ रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्याचवर्षी त्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता.
१९२९ मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. १९३०-३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. १४ फेब्रुवारी १९३५ रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. फेब्रुवारी-मार्च १९३६ मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै १९३८ मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.
३१ ऑक्टोबर १९४० रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर १९४१ मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. ७ ऑगस्ट १९४२ रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण ९ वेळा त्यांना तुरुंगवास घडला. जानेवारी १९४५ मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च १९४६ मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. ६ जुलै १९४६ रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १९५१ ते १९५४ पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
----------------------------------------
🎄 *सामान्यज्ञान* 🎄
आयुर्वेदिक वनस्पती
🔅आघाडा 🔅
आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, त्याला थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. फुलाचा दांडा सुरुवातीला आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे ते जनावरांच्या अंगाला चिकटतात व दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ह्या वनस्पतीचा प्रसार होतो.
आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. एकेकाळी पुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्री, फुले अशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असत
झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. नरक चतुर्दशीच्य दिवशी आघाड्याचे पान मस्तकाभोवती फिरवून मग अभ्यंगस्नान करतात.आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते
------------------------------------------
🔅 *वाक्प्रचार* 🔅
केसाने गळा कापणे- विश्वासात घेऊन विश्वास घात करणे.
------------------------------------------
🔅 *म्हण* 🔅
आयत्या बिळात नागोबा
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
-----------------------------------------
🔅इंग्रजी प्रश्न 🔅
1)How many fingers do you have in one hand?
Ans: Five fingers
2)What do you drink that comes from a cow?
Ans: Milk
3)What part of your body lets you see?
Answer: The eyes
4) What animal goes “Moo”?
Answer: Cow
5)How many months do we have in a year?
Answer: 12 months
------------------------------------------
🎄 *प्रार्थना* 🎄
🔅असो तुला देवा 🔅
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार असो 'तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल तरि प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
॥ ३॥
- साने गुरुजी
------------------------------------------
🔅मनाचे श्लोक 🔅
मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बाले मना राघवेवीण काही।
मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
------------------------------------------
🎄 बडबडगीत 🌲
🔅गाडी आली गाडी आली
गाडी आली गाडी आली - झुक् झुक् झुक्
शिट्टी कशी वाजे बघा - कुक् कुक् कुक्
इंजिनाचा धूर निघे - भक् भक् भक्
चाके पाहू तपासून - ठक् ठक् ठक्
जायचे का दूर कोठे - भूर् भूर् भूर्
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर् दूर् दूर्
तिकिटाचे पैसे काढा - छ्न् छ्न् छ्न्
गाडीची ही घंट वाजे - घण् घण् घण्
गाडीमधे बसा चला - पट् पट् पट्
सामानाहि ठेवा सारे - चट् चट् चट्
नका बघू डोकावून - शुक् शुक् शुक्
गाडी आता निघालीच - झुक् झुक् झुक्
------------------------------------------
🎄 समूहगीत 🎄 🔅हे राष्ट्र देवतांचे🔅
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे राष्ट्र. आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
-----------------------------------
🌲 *बोधकथा*🎄
🔅पहिले पाऊल 🔅
एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे. काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच, असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्या सामानाविषयीची माहिती विचारतो. गावकरी त्याला आवश्यक सामानाची यादी देतात. सोबत कंदील घेऊन जा, असा सल्लाही देतात. मनाशी निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री २ वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो. अंधार असतो.
कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो. तो मनाशी विचार करतो २० किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय. त्याची पावले जागीच थबकतात. त्याच्या मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात. तो साधुला थांबवतो. म्हणतो, तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे. रस्ता धोकादायक आहे. तुम्ही जाऊ नका? साधु हसतो. त्याला म्हणतो, ‘अरे एकदाच दहा पावले कुणाला टाकायचीत? एक पाऊल चालण्याइतका प्रकाश खूप झाला.
एक एक पाऊल टाकत हजारो मैल दूरचा टप्पा आपण सहज गाठू शकतो. तो साधु महाराजांनाच गणिताचा तर्क सांगतो. मी तर्कनिष्ठ आहे. मी श्रद्धाळू नाही. मी गणितज्ज्ञ आहे. मला समजावण्याचा तुमचा प्रयत्न निष्फळ आहे. असे सांगत तो पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची विनंती साधुला करतो. साधू त्याला म्हणतो, बाळा एक पाऊल, अर्थात पहिले पाऊल महत्त्वाचे आहे. पहिले सकारात्मक पाऊल कित्येक किलोमीटरचा तुमचा कठीण प्रवासही सुकर करतो, तर पहिल्याच पावलाला तुमचा विश्वास डगमगल्यास प्रवास कितीही छोटा असू दे, तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचूच शकत नाहीत.
तात्पर्य : कोणतेही काम करतांना सकारात्मक विचार करा .
------------------------------------------
🔅 प्रश्नमंजुषा 🔅
१) कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
उत्तर : अतिसार ,कावीळ,
विषमज्वर
२)बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
उत्तर : क्षयरोग
३) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
उत्तर : बंकिमचंद्र चटर्जी
४) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
उत्तर : सोने
५) मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : चंद्रगुप्त
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
श्री. कैलास भागवत (सर)
जि.प.प्राथ. शाळा आंबीखालसा
ता.संगमनेर जि.अ.नगर
https://guruvary.blogspot.in/p/blog-page_77.html?m=0
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
Sunday, 13 November 2022
गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment